दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त!
अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेने प्लास्टीकचा नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली असून, मागील बारा दिवसांत ‘अकरा ठिकाणी छापे टाकत पथकाने दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मकरसंक्रांतीसाठी पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या मांजाची शहरासह जिल्ह्यात मांजांची विक्री करण्यात येते. मांजामुळे प्राणी तसेच नागरिक जखमी होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी मांजा विक्री करणारे दुकानदार, विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शहरासह संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव तालुक्यात ११ ठिकाणी कारवाया केल्या आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक सहा कारवाया करण्यात आल्या आहेत.