सोनई, दि. २८ – लाखो रुपयांचा खर्च, राबराब मेहनत आणि वर्षभराचं घामाचं पीक… पण बाजारात पोचल्यावर शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू! आज जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात अडकले आहेत.
बाहेरच्या देशात कांद्याचं उत्पादन वाढल्यामुळे निर्यात थंडावली, तर दक्षिण भारतात नवीन कांदा बाजारात आल्याने महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी कमी झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याला आधीच फटका बसलेला असताना आता वाराईच्या दरवाढीने (३ रुपये प्रति गोणी) भर आणली आहे. या वादामुळे कधी मार्केट सुरू, कधी बंद अशी स्थिती निर्माण झाली असून शेतकरी थेट तोट्यात जात आहेत.
७०% उत्पादन अजून शिल्लक!
जिल्ह्यात अजूनही ७० टक्के कांदा शेतकऱ्यांच्या गोदामात शिल्लक आहे. नेप्ती, घोडेगाव आणि राहुरी ही प्रमुख बाजार समित्या आहेत जिथं वर्षभर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. पण सध्या शेतकरी म्हणतोय की – “आमचं कांद्याचं पीक कुठं विकायचं?”
शेतकरी अशोकराव बेल्हेकर यांनी रोष व्यक्त करत म्हटलं की, “आम्ही जीव तोडून कांदा पिकवतो, पण अधिकारी आणि हमाल प्रतिनिधींच्या साटेलोट्यामुळे आम्हाला कोट्यवधींचं नुकसान होतंय. नियम ठरवताना आमचा विश्वास घेतला जात नाही. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे!”
वाराईमुळे गाडीवाल्याचा खर्च वाढतो, आणि त्याचा भार थेट शेतकऱ्याच्या खांद्यावर येतो. पूर्वी १ रुपया प्रति गोणी वाराई घेतली जायची, पण आता ती ३ रुपयांपर्यंत वाढली आहे. हा फरक थेट शेतकऱ्याच्या उत्पन्नावर घाव घालत आहे.
शेतकरी म्हणतोय: कांद्याचे भाव मातीमोल झालेत वाराई आणि हमालीच्या दरवाढीने तोटा वाढला बाजार समित्यांच्या खेळामुळे कोट्यवधींचं नुकसान होणार
आता शेतकरी संघटना आणि बांधवांचा एकच आवाज – “कांद्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढा!”
“कधी शेतकऱ्याला हसवणारा कांदा, आज डोळ्यात पाणी आणतोय!”