‘नगर-मनमाड महामार्गाच्या’ कामासाठी खा. निलेश लंके यांचे मंत्री गडकरी यांना साकडे!
अहिल्यानगर : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे, तसेच बहुचर्चित नगर-मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी (२७ ऑक्टोबर) दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. खा. लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार असलेल्या नीलेश लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. नगर ते पाथर्डी रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी त्यांनी नगर शहरात उपोषण केले होते. नगर-मनमाड रस्त्याचे कामही मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली होती. नगर-मनमाड रस्त्याच्या कामाची नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याने ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे काँक्रिटीकरण करण्याची मागणी खा. लंके यांनी केली असून, मंत्री गडकरी यांनी ते मान्य केल्याचे खा. लंके यांनी सांगितले. मतदारसंघातील काही रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव खा. लंके यांनी या बैठकीत सादर केले. त्या कामांबाबत मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पुढील कार्यवाही करण्यास सांगितल्याचे खा. लंके यांनी सांगितले. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, खा. लंके हे कामाला लागले आहेत. इतर विभागासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यासाठी खा. लंके हे लवकरच मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.