नवी दिल्ली:
ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यूरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती.
आज रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे. त्याआधी ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारत सरकारने तसं ट्विट करून ही माहिती दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनकडे जाणारी आणि ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली होती. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. कोरोना ब्रिटनमध्ये फैलावत असल्याने भारतातही त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं होतं.