नववर्षात प्रलंबित प्रकल्पांना गती देणार, उत्पन्नाचे स्त्रोतही वाढवणार; आयुक्त डांगे

अहिल्यानगर : नववर्षात महानगरपालिकेकडून चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच वर्षभरातील प्रकल्प, योजनांना गती देऊन नाट्यगृह, क्रीडा संकुले, अद्ययावत रुग्णालय, ई-बस सेवा, सीना नदी सुशोभीकरण आदी योजनांसह प्रगतीपथावरील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सद्यस्थितीत शहरात राज्य सरकारने दिलेल्या व . संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे दीडशे रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे नववर्षात पूर्ण करून नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शिवाय, नाट्यगृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्युझिकल फाऊंटन, सीना नदी परिसर सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. रुग्णालयाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ही कामे पूर्ण करून चांगल्या व दर्जेदार सुविधा, सेवा उपलब्ध करण्याचा महापालिकेचा मानस आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून विकसित व्हावे, यासाठी दर शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानात पुन्हा पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डांगे यांनी सांगितलं .