शहर बॅनरमुक्त, दंडात्मक कारवाई शून्य

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका प्रशासनाने अपवाद वगळता शहरातील सर्व ठिकाणचे बॅनर काढून टाकले. मात्र, अवैधरीत्या बॅनर लावणाऱ्यांवर काहीच कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे शहरात लोकांनी बॅनर लावायचे आणि ‘मनपा’ने ते काढून टाकायचे, अशीच पद्धत रूढ झाली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात शहरात रस्त्यांवर, चौकात, गल्लोगल्ली अनधिकृतरीत्या बॅनर लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे दोन्ही उत्सव संपल्यानंतरही ज्यांनी बॅनर लावले त्यांनी ते स्वतःहून काढले नाहीत. शेवटी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने विशेष मोहीम राबवून हे बॅनर काढले. शहरात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर महापालिका कारवाई करू शकते, यात दंड तसेच प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे. मात्र, मनपाकडून अशी कारवाई होत नसल्याने नेते, त्यांचे कार्यकर्ते व व्यावसायिक जागा दिसेल तेथे बॅनरबाजी करून शहर विद्रूप करत आहेत.