“शक्तिमान, बाहुबली नाही – गणपती मूळ रूपातच पाहायचा!”
मनसे स्टाईल इशारा; गणेशमूर्तींवरील नवनवीन प्रयोगांवर आक्षेप

मनसे स्टाईल इशारा; गणेशमूर्तींवरील नवनवीन प्रयोगांवर आक्षेप
अहिल्यानगर | पोलीस न्यूज नेटवर्क अपडेट
गणेशोत्सव जवळ येतोय… आणि त्यातच सध्या ट्रेंड झालेलं आहे ‘विविध थीम्स’मधील गणेशमूर्तींचं प्रदर्शन. पण यावर आता मनसेचा स्ट्रॉंग स्टँड आला आहे!
मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं असून इशारा दिलाय – “शक्तिमान, बाहुबली किंवा इतर काल्पनिक रूपांत गणपती साकारला, तर मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल!”
वर्मा म्हणाले –
“गणपतीचं मूळ हत्तीच्या मुखाचं रूप हे शंकराने दिलेलं पवित्र रूप आहे. आजकाल काही मंडळं आणि मूर्तिकार फॅन्सी थीम्समध्ये गणरायाला वेगवेगळ्या रुपात साकारतात – कधी कलाकाराच्या रूपात, कधी पॉप कल्चर कॅरेक्टरमध्ये. हे धर्माच्या विटंबनेसारखं आहे!”
त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केलंय –
मूळ रूपाशिवाय अन्य कोणतीही गणेशमूर्ती उभारल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करावी
हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या मूर्तींवर गुन्हे दाखल करावेत
मूर्तिकारांनीही अशा विद्रूप मूर्ती बनवण्यास विरोध करावा
“गणेशोत्सव हा श्रद्धेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे – तो पॉप कल्चर शो बनवू नका,” असं आवाहन वर्मा यांनी सर्व मंडळांना आणि मूर्तिकारांना केलं.
“जर तरीही कोणी अशा मूर्ती उभारल्या, तर मनसे स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
सोशल मीडियावर आता या इशाऱ्याची जोरदार चर्चा आहे!