श्रीसाईनाथ रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर!
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी व गिव्ह मी फाइव फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे दि. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरामध्ये एकूण ९७ रुग्णांची तपासणी करून २९ गरजू रुग्णांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिरात प्रामुख्याने जळीत रुग्णांची चिकटलेली त्वचा, चिकटलेले खांदे, जन्मजात चिकटलेली बोटे, चिकटलेली मान, हात, जन्मजात असलेले व्यंग अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. श्रीसाईनाथ रुग्णालयातील हे तिसरे प्लास्टिक सर्जरी शिबिर आहे. यापूर्वी साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त १०० व त्यानंतर दुसऱ्या शिबिरामध्ये ३५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
बरेच रुग्ण जन्मापासूनच व्यंग असल्यामुळे व शस्त्रक्रियेकरिता लागणारा खर्च परवडणारा नसल्यामुळे रुग्ण शस्त्रक्रियेविना वंचित राहतात. साई संस्थानने पुढाकार घेऊन सदर प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शस्त्रक्रियेबरोबरच रुग्णांना लागणारी आवश्यक औषधेदेखील मोफत देण्यात आली. तसेच शिबिरार्थी रुग्णांना जेवण व रुग्णांच्या नातेवाइकांची व्यवस्थादेखील राहण्याची संस्थानमार्फत मोफत करण्यात आली. श्रीसाईनाथ रुग्णालयातील डॉ. राम नाईक, डॉ. रेवण ऐणगे, डॉ. विद्या बोराडे, जनरल सर्जन, डॉ. गोविंद कलाटे, डॉ. मृणालिनी गोंदकर, डॉ. प्राजक्ता बनकर, भूलतज्ज्ञ, अधिसेविका नजमा सय्यद, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.