ख्रिस्ती समाजाची दफनभूमी हडपण्याचा कट उघड!
नागापूरच्या पवित्र जागेवर अनधिकृत खरेदीखताचा डाव – पोलीसांकडे तक्रार!
ख्रिस्ती समाजाची दफनभूमी हडपण्याचा कट उघड! नागापूरच्या पवित्र जागेवर अनधिकृत खरेदीखताचा डाव – पोलीसांकडे तक्रार!
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज नेटवर्क
नागापूरमधील ख्रिस्ती समाजाच्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दफनभूमीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध करत समाजबांधवांनी पोलीस उपअधीक्षक भारती यांना निवेदन सादर केलं.
मिळकत क्र. 976 आणि 977 अ. या जागेवर दशकेभरापासून अंत्यसंस्कार होत आहेत. ही जागा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. मात्र, श्रीपाद छिंदम या व्यक्तीने अनधिकृत खरेदीखत तयार करून जागा हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात सांगण्यात आलं की, छिंदम यांनी काही ग्रामस्थांना दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दबाव आणल्याचंही नमूद करण्यात आलं.
यावेळी ख्रिस्ती समाजाचे शेकडो नागरिक उपस्थित होते, ज्यात विश्वास भाकरे, सुरेश बनसोडे, आलेशा भाकरे, सोनाली भाकरे, दानिएल भाकरे यांच्यासह 40 हून अधिक प्रतिनिधींचा समावेश होता.
समाजाचे म्हणणे स्पष्ट आहे –
“ही जागा केवळ जमीन नाही, तर आमच्या पूर्वजांची आठवण, आमचा धार्मिक विश्वास आणि परंपरेचा भाग आहे. अनधिकृत ताब्याचा प्रयत्न हा आमच्या श्रद्धेवर आघात आहे!”
मागणी काय?
या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
दफनभूमीचे कायदेशीर संरक्षण सुनिश्चित करावे.
धमकी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा द्यावी.
