धनंजय मुंडे  आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळला

 गंगाखेड  साखर कारखान्याला  आकसापोटी परवानगी दिली नाही, असा आरोप

बीड : 

गंगाखेड  साखर कारखान्याला  आकसापोटी परवानगी दिली नाही, असा आरोप  राष्ट्रीय समाज पक्षाचे  गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे  यांनी केला होता. दरम्यान गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गाळप परवान्यावरून धनंजय मुंडे  आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांची तक्रार गुट्टे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार  यांच्याकडेच केली असल्याने गुट्टे आणि मुंडे यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय.  ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर धनंजय मुंडे हे घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा  गुट्टे यांनी केला आहे. त्याचबरोबर गंगाखेड शुगरला ज्या अटी लावल्या आहेत, त्या तुमच्या कारखान्याला का नाहीत? असा सवाल गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान ‘उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं’, असं आव्हान देखील गुट्टे यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब, आपण देशाचे नेते आहात. आपल्या हातानेच पहिली मोळी टाकली आहे.

यंदा कारखाना सुरु करुन आपला वाढदिवस साजरा करा, अशी विनंती गुट्टे यांनी पवारांकडे केली आहे. त्याचबरोबर गंगाखेड शुगर सुरु झाला नाही तर परिसरातील ७ लाख टन ऊस गाळपाअभावी उभा राहिल, अशी भीती गुट्टे यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी गुट्टे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

कारखाना गेल्या काही वर्षात परभणीसह लातूर, बीड, नांदेड या चार जिल्ह्यातील सीमेवरील ऊस उत्पादकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला आहे. गुट्टे यांचे कारखान्याच्या माध्यमातूनच राजकारणात पदार्पण झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्तेच या कारखान्याची पायाभरणी झाली होती. गुट्टे हे सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कंपूमध्ये दाखल झाले होते. मात्र पुन्हा ते रासपचे नेते महादेव जानकर यांच्या संपर्कात आले. तेथूनच गंगाखेडमध्ये राजकीय संघर्षाला सुरूवात झाली.

कारखान्याला ऊस घातल्यानंतर १५ दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले असून, गंगाखेड शुगरने सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलं. तरीही राजकीय आकसापोटीच गंगाखेड शुगरला गाळपास परवानगी दिली नाही, असा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे.