अकोल्यात राजकीय भूकंप: पिचड यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत सामील, ‘कमळा’ऐवजी ‘घड्याळा’ला पसंती
"कमळाची साथ संपली, घड्याळाने पकडली गती"
अकोल्यात राजकीय भूकंप: पिचड यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत सामील, ‘कमळा’ऐवजी ‘घड्याळा’ला पसंती
अकोले तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत वैभव पिचड यांचे कट्टर समर्थक असलेल्या वाशेरेगावचे सरपंच किरण गजे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षांतरात खरेदी-विक्री संघाचे संचालक कविराज भांगरे, शेरणखेल येथील भाऊसाहेब कासार, राजाराम कासार, उपसरपंच संतोष वाक्चौरे, रमेश भांगरे, यशवंत डोळस, पांडुरंग भांगरे, गजानन कातळे, नवनाथ करवंदे, प्रफुल्ल भांगरे, किरण कोंडार, बाजीराव सदगीर, रविंद्र साबळे, तेजस मेंगाळ, भाऊसाहेब तळपाडे आणि मदन डगळे यांचा समावेश आहे.
या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला आमदार डॉ. लहामटे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष शरद चौधरी, शहराध्यक्ष अक्षय अभाळे, मुकुंद लहामटे, ईश्वर वाक्चौरे व डॉ. अविनाश कानवडे यांचीही उपस्थिती होती. या घडामोडीनंतर अकोल्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
या बातमीने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, “कमळाची साथ संपली, घड्याळाने पकडली गती” अशी प्रतिक्रिया तरुणांमध्ये दिसून येत आहे.