न्यू आर्टस् कॉलेजचा पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीमध्ये तृतीय क्रमांक!

अहिल्यानगर : न्यू आर्टस् कॉलेजने नुकत्याच झालेल्या पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीमध्ये सांघिक तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाने या स्पर्धेत पवन पोटे लिखित ‘देखावा’ ही वर्तमानातील सामाजिक प्रश्नावरील एकांकिका सादर केली होती. यापूर्वीही महाविद्यालयाच्या ‘माईक’ व ‘लाली’ या दोन एकांकिकांनी पुरुषोत्तम महाकरंडक दोन वेळ जिंकला होता. आता तिसऱ्यांदा करंडकावर नाव कोरले आहे. स्पर्धेतील अभिनयाची दोन पारितोषिकेदेखील पटकावण्याचा मान महाविद्यालयाने मिळविला. पवन पोटे व अथर्व धर्माधिकारी यांनीही पारितोषिके मिळवली आहेत. मराठी नाट्यसृष्टीमध्ये अत्यंत नामांकित पुरुषोत्तम करंडक मिळविणे हे एक मोठे दिव्य असते. अशाच स्पर्धेमध्ये सहा वेळा यश मिळविण्यात न्यू आर्ट्स कॉलेज यशस्वी ठरले आहे. आतापर्यंतच्या या सर्वच विद्यार्थी कलावंतांना सांस्कृतिक कला मंडळाचे चेअरमन डॉ. नवनाथ येठेकर यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, संस्थेचे सर्व विश्वस्त सदस्य, प्राचार्य बाळासाहेब सागडे, संचालक डॉ. भास्कर झावरे यांनी अभिनंदन केले.