औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांना वाहिली आदरांजली!

अहिल्यानगर : पद्मविभूषण रतन टाटा यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाला औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये नावलौकिक मिळवून दिला. सहकाऱ्यांशी नातेसंबंध मजबूत करून प्रेरणादायी कार्यसंस्कृती निर्माण केली, तसेच कामात दृढता कशी साधावी, याचा आदर्श घालून दिला, असे प्रतिपादन बी. पी. एच. ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी केले. बी. पी. एच. ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च) संस्थेतर्फे पद्मविभूषण रतन टाटा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, संचालक डॉ. यू. एच. नगरकर, डॉ. प्रणोती तेलोरे, डॉ. स्वाती बार्नबस, शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना टाटा यांच्या जीवनावर आधारित एक ऑडिओ-व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. यामध्ये टाटा यांच्या भाषणांचे आणि चित्रांचे संकलन होते. सानिया शेख, प्रथमेश कदम, सॅमसन शिंदे, रुतुजा गोरे, अभिषेक बेद्रे, शर्वरी कदम, जान्हवी साळी, सिद्धी गांधी, युसूफ शेख आणि रिफत बागवान यांनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी परिश्रम घेतले.