अहमदनगर
कोरोनाच्या संकटकाळात घर घर लंगरसेवेने दिलेले निस्वार्थ योगदान कौतुकास्पद आहे. या संकटकाळात गरजूंना लंगर सेवेचा आधार मिळाल्याने संकटाची भीषणता कमी होण्यास मदत झाली. निस्वार्थ देवा देण्यासाठी मोठे मन लागते. मोठ्या मनाने सर्व देवादार योगदान देत आहे. लोकप्रतिनिधींच्या एक पाऊल पुढे जाऊन लंगर सेवेने सर्वसामान्यांना विविध प्रकारची मदत दिली. अशा जागृक नागरिकांच्या निस्वार्थ भावनेने कार्य सुरु राहिल्यास शहराला एक वैभव प्राप्त होणार असल्याची भावना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

पुढे खासदार विखे म्हणाले की, म्युकॉरमायकोसिस या बुरशीजन्य आजार होत असताना, कोरोना उपचारादरम्यान नियमीत स्वच्छता व काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या आजाराच्या उपचारासाठी विळद घाटात उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी लंगर सेवेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॅनचे मोफत वाटप करण्यात आले. सर्वसामान्य कोरोना रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा घेण्यासाठी पैसे नसतात. अशा रुग्णांना घरीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निशुल्क ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी लंगर सेवेने पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने कोणत्याही रुग्णांचे जीव जाऊ नये, या भावनेने घर घर लंगर सेवा योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.