न्या. संजीव खन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती, ११ नोव्हेंबरला होणार शपथविधी
न्या. संजीव खन्ना यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ५१ वे सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी न्या. संजीव खन्ना सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. चंद्रचूड यांनी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडिया पोस्ट करून न्या.खन्ना यांच्या नियुक्तीची घोषणा केली. राष्ट्रपती, सरन्यायाधीश यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर भारतीय संविधानाने दिलेल्या प्रदत्त अधिकारानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशपदी संजीव खन्ना यांची नियुक्ती करताना मला मनस्वी आनंद होत आहे, असे मंत्री मेघवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. सरन्यायाधीशपदाचा न्या. खन्ना यांचा कार्यकाळ हा सुमारे ७ महिन्यांचा असेल. ते १३ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.