ठाकरे सेनेकडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर
अहिल्यानगर : उद्धव ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात नेवाशामधून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिन्ही आमदारांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या अहमदनगर शहर मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख हे २०१९ मध्ये अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. याहीवेळी त्यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांच्या तिन्ही आमदारांना एबी फार्म दोन दिवसांपूर्वीच दिले होते. बुधवारी त्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात संग्राम जगताप, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे यांचा समावेश आहे