चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले अन् अन्याय झाला म्हणता !

चारवेळा उपमुख्यमंत्रिपद, अनेक वर्षे मंत्रिपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता, असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ नेते शरद – पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र सांगता सभेत वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कसला अन्याय झाला, कोणाकडून झाला, असा उपरोधिक सवाल केला आहे. युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असेदेखील पवार यांनी यावेळी नमूद केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपाबाबत ज्येष्ठ नेते पवार यांनी तुरुंगात असणाऱ्या व्यक्तीच्या आरोपाची नोंद घेण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला अस्वस्थ करणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

◈ त्यांनी १७५ सांगितल्या, २८० सांगायला हव्या होत्या

◈ विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवार म्हणाले, लोकांना बदल हवा आहे, राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल. मी काही ज्योतिषी नाही, जागा निश्चित सांगणार नाही. परंतु राज्यात बहुमताचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

◈ काटेवाडीत मतदानानंतर आज अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीचे सरकार राज्यात येणार असून १७५ जागा मिळतील, असा दावा केला होता. त्यावर त्यांनी फक्त १७५ सांगितल्या २८० जागा सांगायला पाहिजे होत्या, असा टोला शरद पवार यांनी लगावला.