शेतकरी प्रश्नांवर ३ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा!

अहिल्यानगर – राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने ३ मार्च २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार, २५ फेब्रुवारी रोजी संगमनेर येथे झालेल्या बैठकीत या आंदोलनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजी नगर रोड येथे उपस्थित राहावे. तेथून कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येईल.
  • आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
  1. शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
  2. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा.
  3. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी.
  4. वाढत्या वीजबिलांवर तातडीने नियंत्रण आणावे.
हे आंदोलन शांततामय मार्गाने होईल व जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल, किसान काँग्रेस, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, क्रीडा विभाग, व्यापारी वर्ग, आणि इतर आघाड्यांनी या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी आवाहन केले आहे.