अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सह्याद्री आणि न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कामाची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने ‘सर्टीफीकेट ऑफ कमिटमेंट’ हे सन्मानपत्र नुकतेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दिपक हारके यांनी सन्मानीत केले.
कोरोनाच्या दुसर्या टप्प्यात नगर शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या ऑक्सीजन तुटवड्याबाबत शिवाजी शिर्के यांनी सरकारचे लक्ष वेधले. अवघ्या काही तासात नगर शहरातील बहुतांश हॉस्पिटलमधील ऑक्सीजन संपणार असल्याची माहिती शिर्के यांना मिळाली होती. ऑक्सिजन मिळाला नाही तर अनेक रुग्णांचे जीव जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याकडे त्यांनी प्रशासनासह सरकार आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांच्यासह जिल्हाधिकार्यांशी थेट संपर्क ठेवत अवघ्या काही तासात हा विषय शिर्के यांनी मार्गी लावला होता. त्यातूनच शिर्के यांचा इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या (आयएमए) नगर शाखेच्या वतीने याआधीच गौरवही करण्यात आला होता. सामाजिक भान जपताना शिर्के यांनी कर्जुलेहर्या (पारनेर) या गावात गावकर्यांच्या मदतीने कोवीड सेंटरही सुरू केले होते. या सेंटरच्या माध्यमातून साडेचारशे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते.
मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांच्या कामाची दखल या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. विशेषतः कोरोना काळात संपादक शिर्के यांनी घेतलेली भूमिका, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर केलेली जनजागृती, समाजाच्या वेदना जाणून घेऊन त्यावरील उपाययोजनांसाठी केलेले प्रयत्न आदी कामांची दखल घेऊन त्यांचा या सन्मानपत्राने गौरव करण्यात आला आहे.
शिवाजी शिर्के यांच्या या कामाची दखल घेत त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांच्यावतीने सन्मानपत्र देऊन आज गौरविण्यात आले. यावेळी नगर सह्याद्रीचे कार्यकारी संपादक सुहास देशपांडे, मुख्य व्यवस्थापक सुनील नाईकवाडी, निवासी संपादक सुनील चोभे, ग्लोबल सह्याद्रीचे अर्जुन राजापुरे, उपसंपादक अभिषेक शिर्के यांच्यासह सह्याद्री वृत्तसमुहाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिर्के यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.