लाडकी बहीण योजनेत धक्कादायक घोटाळा!
तब्बल 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी घेतला बोगस लाभ – कारवाईला सुरुवात
लाडकी बहीण योजनेत धक्कादायक घोटाळा!
तब्बल 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी घेतला बोगस लाभ – कारवाईला सुरुवात
मुंबई :
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आधी “सरसकट महिलांना फायदा” अशी घोषणा करून निवडणुकांपूर्वी क्रेडिट घेणाऱ्या सरकारवर आता बोगस लाभार्थ्यांचा पाढा उघडकीस येत असल्याने टीकेची झोड उठली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यभरातील तब्बल 26 लाख महिलांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली होती. एका घरातील दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, तरी अनेक ठिकाणी तीन-चार महिलांनी हा फायदा घेतल्याचे आढळले. यामुळे विरोधकांनी सरकारवर “आता महिलांची गळती सुरू झाली” अशी टीका केली होती.
आता या वादात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे – राज्यातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचारी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, महिन्याला मिळणारे 1500 रुपये या महिला कर्मचाऱ्यांनी नियमांना छेद देऊन आपल्या खात्यात टाकले.
महिला व बालविकास विभागाने ही माहिती सरकारसमोर आणली असून, राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेच्या CEOंना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हणजेच, बोगस माहिती देत योजनेंतर्गत पैसे घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता “टांगती तलवार”!
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. “ही योजना खरंच बहिणींसाठी की राजकीय फायद्यासाठी?” असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकही सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
पुढे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा पैसा पोहोचतो का, की अजून किती बोगस प्रकरणं उघड होणार – याकडे राज्यभराचे डोळे लागले आहेत.
