
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर राहुरीत उठलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले!
राहुरी (अहिल्यानगर) – सरकारी काम करूनही मेहनतीचे पैसे न मिळाल्याने जीव गमावलेल्या सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता बिल्डिंग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया – अहिल्यानगर सेंटर यांनी राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD) कार्यालयासमोर एक भावनिक फलक लावून सिस्टमवरील रोष व्यक्त केला आहे.
फलकावरील मजकूर ठसठशीत आणि खोल परिणाम करणारा:
“ही आत्महत्या नाही… भिकेला लागलेल्या अर्थव्यवस्थेचा बळी आहे!”
“सरकारी काम करूनही महिनोमहिने पैसे थकवले गेले… व्यवस्थेने एवढा छळ केला की आत्महत्या हा पर्याय वाटू लागला!”
या फलकामुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. कोणताही युवा उद्योजक, कामगार किंवा कंत्राटदार अशा स्थितीत पोहोचू नये, यासाठी शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.
या घटनेनंतर पुढील प्रश्न उभे ठाकलेत:
का इतक्या दिवसांनीही देयके दिली जात नाहीत?
का सरकारी खात्यांचे व्यवहार एवढे ढिसाळ आणि अकार्यक्षम आहेत?
आणि मुख्य म्हणजे – एखादा तरुण फक्त वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे स्वतःचं आयुष्य संपवत असेल, तर ही व्यवस्थाच कुठे अपयशी नाही का?
बिल्डर्स असोसिएशनने दिलेला हा फलक फक्त श्रद्धांजली नाही, तर व्यवस्थेला दिलेला एक थेट इशाराच आहे.