वाल्मीक कराडवर १४ गुन्हे, तरीही ‘लाडकी बहीण योजनेचे’ अध्यक्ष

महाराष्ट्र : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मीक कराड कायम आहे. विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती. कराडवर १४ गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीचे कार्यालय आहे. येथीलच एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सीआयडी पथक करीत आहे. कराड हा पुण्यात शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत.

समितीमध्ये कोण आहेत?

  • तत्कालीन पालकमंत्री धनजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत एक समिती तयार केली. त्याप्रमाणे परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक कराड याची नियुक्ती केली होती. यासह इतर दोन अशासकीय सदस्य आणि काही अधिकारी, कर्मचारीही या समितीचे सदस्य आहेत.
  • समितीत बदल केला आहे का, याची विचारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संपर्क केला. परंतु, त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही. लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवरदेखील वाल्मीक कराड सदस्य आहे.