महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले; मात्र भाजीविक्रेते या रस्त्यावर पुन्हा ठेले मांडून बसले

अहिल्यानगर : शहरातील पारिजात चौक ते एकवीरा चौकापर्यंतच्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले होते. येथे पुन्हा विक्रीसाठी बसू नका, असेही सुनावले होते. शुक्रवारी मात्र, सकाळीच भाजीविक्रेते या रस्त्यावर पुन्हा ठेले मांडून बसल्याने अतिक्रमणविरोधी कारवाई फार्स ठरली. पारिजात चौक ते एकवीरा चौकापर्यंत रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून भाजीविक्रेते ठेले मांडून असतात. यामुळे या ठिकाणी सकाळी ७ ते दुपारी ११ ते बारापर्यंत मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. बहुतांशी भाजीविक्रेते हे रहिवाशांच्या प्रवेशद्वारासमोरच ठेले मांडून बसतात, त्यामुळे वाहनचालकांना जागा नसते. त्यामुळे अनेकदा येथे वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. तसेच भाजीपाला विकून झाल्यानंतर विक्रेते कचरा व प्लास्टिक जागेवरच सोडून जातात. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवरील साइट गटारी घाणीने तुंबल्या आहेत. तसेच येथे पडलेले प्लास्टिकही दिवसभर सर्वत्र पसरून घाण निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसरातील भाजीविक्रेते हटवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. या मागणीनुसारच व महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने विक्रेत्यांना तेथून हटविले. मात्र, शुक्रवारी तेथे पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली.