जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व अनामप्रेम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड नसलेल्या अतिअपंग, बहुविकलांग यांच्यासाठी आधारकार्ड मेळावा.
अहमदनगर : शारिरीक अतिअपंगत्व, हात नसणे, डोळे नसणे अथवा रेटिना प्रश्न यामुळे अपंग, बहुविकलांग यांचे युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात आधारकार्ड न मिळण्याचे प्रमाण अधिक आहे. आधार कार्ड नसल्याने अनेक अपंग यांना शिक्षण, व्यवसाय, बँकखाते, पॅनकार्ड व विविध शासकीय योजना मिळवण्यात अडचणी येतात. या कारणाने जिल्हा न्यायालयाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अनामप्रेम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आधारकार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती विधी सेवा च्या सचिवा मा. न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांनी दिली आहे. मा. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि प्रधान न्यायाधीश मा. सुनील गोसावी व मा. न्यायमूर्ती सुधाकर यार्लगड्डा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा आधारकार्ड मेळावा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आधारकार्ड बनविण्यात अडचणी आलेल्या बहुविकलांग व दिव्यांग यांनी व त्यांच्या पालकांनी अनामप्रेम संस्था, गांधी मैदान, अहमदनगर येथे दिनांक 15 जून 2023 ते 20 जून 2023 या काळात अपंग प्रमाणपत्रासह आधारकार्डसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या बहुविकलांग यांना प्रत्यक्ष संस्थेत भेट देता येणार नाही, त्यांच्या पालकांनी नोंदणीसाठी प्रत्यक्ष भेटावे. अनामप्रेम संस्थेत नोंदणीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने बहुविकलांग, अपंग, दिव्यांग यांचे परीक्षण करून आधारकार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अनामप्रेमचे एड. अजित कुलकर्णी, इंजि. अजित माने, डॉ. मेघना मराठे, अभय रायकवाड, उमेश पंडूरे, विष्णू वारकरी या मेळाव्यासाठी दिव्यांगांचे सर्वेक्षण करीत आहेत.