
वाढते वजन कमी करण्यासाठी विविध पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी आहे. डेन्मार्कची नोवो नॉर्डिस्क कंपनी वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले वेकोवी (Semaglutide) इंजेक्शन आता भारतात घेऊन आली आहे. २४ जून रोजी हे औषध भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आले असून, त्याची किंमत ₹17,345 आहे.
वेकोवी काय आहे?
वेकोवी हे GLP-1 रिसेप्टर अॅगोनिस्ट प्रकारातील औषध आहे, जे टाइप 2 डायबेटीसच्या उपचारासाठी डिझाइन करण्यात आले होते. परंतु, उच्च मात्रेतील सेमाग्लूटाइड फॉर्म्युलेशनचा उपयोग आता वजन कमी करण्यासाठी केला जात आहे. हे इंजेक्शन आठवड्यातून एकदा घ्यावे लागते.
अमेरिका आणि युरोपसारख्या देशांत वेगोवी, ओजेम्पिक आणि मौंजारो या औषधांनी उत्तम परिणाम दिल्यानंतर आता भारतीय बाजारात हे इंजेक्शन आले आहे. मौंजारोनंतर भारतात लाँच झालेले हे दुसरे वजन कमी करणारे इंजेक्शन आहे.
वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन सुरक्षित आहे का?
जनरल सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांच्या मते –
“वाढते वजन केवळ दिसण्याशी संबंधित नसून त्यामागे अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. अनेकदा डाएटिंग आणि व्यायाम करूनही काही लोकांचे वजन कमी होत नाही, कारण त्यामागे शरीररचना, जनुकीय कारणे किंवा पचनसंस्थेतील रासायनिक बदल कारणीभूत असतात. अशावेळी विज्ञानाने शोधलेली ही औषधे उपयुक्त ठरू शकतात. मात्र, योग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि आहार-व्यायामाबरोबरच ही औषधे वापरणे गरजेचे आहे.”
महत्त्वाचे मुद्दे :
वेगोवी आठवड्यातून एकदा दिले जाणारे इंजेक्शन आहे.
भारतात किंमत ₹17,345 प्रतिडोस आहे.
BMI 35 पर्यंत असलेल्या लोकांमध्ये प्रभावी; अधिक BMI आणि इतर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
आहार आणि व्यायामासोबत च औषधांचा उपयोग करावा.
टीप: वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःची पूर्ण तपासणी करूनच निर्णय घ्या.