त्या पोलीस निरीक्षकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी

जातीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन न घेता, फिर्यादी महिलेला धमकाविल्याचा आरोप ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्याला देखील मोकळीक

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्या व्यक्तीवर व गुन्हा दाखल करुन न घेता मागासवर्गीय फिर्यादी महिलेस धमकाविणार्‍या नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, पूजा साठे, संदीप वाघचौरे, पवन भिंगारदिवे, संपदा म्हस्के, विजय शिरसाठ, जावेद सय्यद, किशोर वंजारे, प्रिया वंजारे, लखन सरोदे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 8 जून रोजी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये प्रिया वंजारे यांच्या फिर्यादीवरुन अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिया वंजारे या राजवाडा भानस हिवरा (ता. नेवासा) येथील रहिवासी आहे. त्यांना सतत जातीय हिनतेची वागणूक तसेच जातीय अत्याचार व मानसिक त्रास देण्याचा काम रेणुका भणगे व किशोर जोजार यांच्यामार्फत केला गेला. किशोर जोजार यांच्या सांगण्यावरून हा अत्याचार करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाला याची कल्पना असताना देखील पोलीस प्रशासनाची हितसंबंध व गावात राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
हा दाखल होण्यासाठी रिपाई महिला आघाडीच्या वतीने दोनदा उपोषण करण्यात आले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या दिवशी फिर्यादी प्रिया वंजारे आपल्या कुटुंबासह नेवासा पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करून न घेता त्यांना उलट धमकाविले. व त्याच दिवशी त्यांचे पती किशोर वंजारे यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पोलीस निरीक्षक यांनी प्रिया वंजारे मागासवर्गीय असल्याने त्यांना गुन्हा दाखल करुन न घेता धमकाविले. तर हा जातीय अत्याचार जोजार यांच्या सांगण्यावरुन झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.