सुमती प्रभा ट्रस्टच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शिक्षणाने यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो -विजेंद्र पटनी
अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व गणित, विज्ञान विषयात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुमती प्रभा ट्रस्टच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सुमती प्रभा ट्रस्टचे विजेंद्र पटनी, उषा पटनी, रमेश काबरा, मंगल काबरा, गिरीजालाल तोष्णीवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रास्ताविकात विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमिल यांनी शाळेच्या वाढत्या गुणवत्तेचा आलेख सादर करुन उपस्थित पाहुण्यांचा परिचय करुन दिला. विजेंद्र पटनी म्हणाले की, शिक्षणाने यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो. शिक्षणाशिवाय सर्व गोष्टी गौण आहेत. पैसा हा दुय्यम असून, आयुष्यात ज्ञानसंपन्न झाल्यास पैसा आपोआप येतो. ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच जागृक राहून कष्ट करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन करुन स्वत: व भाऊसाहेब फिरोदिया शाळेची माजी विद्यार्थिनी असलेल्या मुलीच्या शैक्षणिक प्रवासाचा उलगडा केला. रमेश काबरा यांनी प्रामाणिकपणे काम करून कष्टाची तयारी ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित असल्याचे सांगितले. शिकागो येथे कार्यरत असलेल्या पटनी यांची कन्या यांनी भाऊसाहेब फिरोदिया शाळेत झालेले शिक्षणाने आयुष्य घडल्याचे पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाद्वारे सांगितले. तर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. गिरीजालाल तोष्णीवाल यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात योगदान देण्याचे सांगितले.
मुख्याध्यापक उल्हास दुगड यांनी अशा गुणगौरवाने विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळत असते. ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी यशवंत होण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी मानस कुंटला, ऋषिकेश पिंपळे, सानिका नगरकर, सुजय देशपांडे, गौरी घुगरे यांचा सत्कार करुन त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा शिंदे यांनी केले. आभार सचिन पवार यांनी मानले.