अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ आणल्यास तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही -अ‍ॅड. गवळी

राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने तळीराम सरकार म्हणून घोषित केले. तर या सरकार विरोधात निवडणूकमध्ये डिच्चू कावा तंत्र वापरण्याचे आवाहन करुन, अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ न आणता हा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राज्य सरकारने किराणा दुकानातून वाईन विक्री  निर्णयाच्या विरोधात उपोषण करणार आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातील जनतेला जनहितासाठी आंदोलनात सहभागी करुन घेण्याच्या उद्देशाने वाईन विक्रीला या संघटनांनी विरोध दर्शविला आहे. वाइन द्राक्षापासून बनते आणि त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण फार अल्प असते, असा सरकारचा दावा आहे. सरकारने महसुल वाढविण्यासाठी वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. परंतु किराणा दुकानातून विकली जाणारी वाईन हळूहळू महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत घराघरात जाऊन तळीराम बेवडे तयार होतील. यामुळे राज्यातील सगळीकडे कौटुंबिक वाद वाढल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊन पोलिस व न्याययंत्रणा सुद्धा महाराष्ट्रासाठी अपुरी पडणार असल्याचा धोका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे.

ठाकरे सरकार मधील तिन्ही पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतात. परंतु महाराजांच्या उन्नत शिवचेतनेशी विसंगत हे सरकार वागत आहे. अण्णा हजारे यांचे सध्याचे 84 वय आहे. अशा गांधीवादी वृद्ध व्यक्तीला प्राणांतिक उपोषण करण्याची पाळी या सरकारने आणली आहे. या प्रकरणातून तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नसल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र नशेबाजांचे राज्य आहे, अशी बदनामी होऊ नये व भविष्यातील धोका ओळखून हा निर्णय मागे घेण्यासाठी संघटना आग्रही आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.