अधिका-यांना दमबाजी करून दबावाचे राजकारण माजी मंत्री राम शिंदे करीत आहे – आ. रोहीत पवार

कर्जत नगरपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विरोधकांनी दोनशे लोक आणून अधिका-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वेळेअभावी आमचे आणखी तीनजण बिनविरोध झाले नाही उलट त्यांनीच आंदोलन करून भावनिक आवाहन करीत आहेत असा आरोप आ. रोहीत पवार यांनी केला.
आ. रोहीत पवार कर्जत मधील शहाजीनगर सभा आटोपून पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, कॉग्रेस नेते प्रविण घुले, नेटके मेजर, प्रसाद ढोकरीकर, भाऊ तोरडमल, विशाल म्हेञे, सचिन घुले, अमृत काळदाते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले आम्ही विकासकामाच्या जोरावर निवडणूक लढवत आहोत. श्री संत गोदडमहाराज यांच्या विचारांचा प्रसार व भक्तनिवास, अध्यात्मिक व धार्मिक शहर विकास आराखडा, शहर व वाड्या वस्त्यासाठी वाढीव पाणी योजना, अंतर्गत रस्ते, गटार, महिलांच्या बचतगट, स्वच्छता, सिसीटीव्ही, क्रिडासंकुल, औद्योगिक वसाहत, दहावी बारावी मुलांचे प्रश्न, सुशोभीकरण आदी प्रश्न घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाला संधी दिली व भाजपा उमेदवाराने माघार घेतली व राष्ट्रवादीचा धनगर समाजाचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला याचे त्यांना वाईट का वाटते तसेच त्यांच्या जवळच्या लोकांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे ही निवडणूक हारल्यासारखे आहे. त्याचे प्रायश्चित्त म्हणून दोन दिवस ते मंदीरासमोर आत्मचिंतनासाठी बसले. भावनिक राजकारण करून निवडणूक जिंकता येत नाही असा टोला आ. रोहीत पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.