अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड आरक्षणाची वर्गवारी करावी लहुजी शक्ती सेनेची मागणी

अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड आरक्षणाची वर्गवारी करण्याच्या प्रमख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. तर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे येथील तालिम ते मुंबई विधान भवनावर विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पायी मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, संघटक लक्ष्मण साळवे, केडगाव शहराध्यक्ष अभिजीत सकट, कृष्णा गाडेकर आदी उपस्थित होते.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे, अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड आरक्षणाची वर्गवारी करावी, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक संगमवाडी येथे उभारावे, मुंबई विद्यापीठाला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, महाराष्ट्रभर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सरकारने उचित असे कायदे तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, मुंबई विधान भवनावर निघालेल्या मोर्चाचे सर्व सर्व मागण्या तात्काळ मंजूर करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुरु असून, या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.