अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस ४ वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस ४ वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा रस्त्यामध्ये हात धरून तिच्याशी गैरवर्तन करणारा लक्ष्मीकांत नारायण ढगे ( वय ४१ , रा . गजानन महाराज मंदिराजवळ , गुलमोहर रस्ता , अहमदनगर ) याला चार वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम . व्ही . देशपांडे यांनी ठोठावली .


अल्पवयीन मुलगी दि . 15 एप्रिल 2017 रोजी वृत्तपत्र घेऊन घरी परत येत होती . आरोपी ढगे याने जवळ येऊन चौथीचे क्लास कोठे आहेत ? अशी चौकशी करून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल , असे गैरवर्तन करू लागला . या मुलीच्या घरी दूध देणारा आणि काही ओळखीच्या व्यक्तींनी ही घटना पाहिली . त्यावेळेस त्यांनी आरोपीला जाब विचारला असता , त्याने या प्रकाराची कबुली दिली . मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी ढगे याच्याविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून दाखल संरक्षण कायदा 2012 ( पोक्सो ) कायद्यान्वये गुन्हा करण्यात आला . महिला पोलिस उपनिरीक्षक के.डी. शिरदावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले . या खटल्यात सरकारच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले . पीडित मुलगी , मुलीचे पालक , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या . ढगे याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास चार वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंड , दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली . अॅड . मोहन कुलकर्णी यांनी सरकारतर्फे काम पाहिले . पोलिस हवालदार मोहन डहारे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले . दरम्यान , अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी चाईल्ड लाईनची संपर्क साधला . चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी मानसिक आधार दिला . मुलीच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका महत्वाची ठरली .