अल्पवयीन मुलीस छेडणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सचिन तुळशीराम शिकारे ( धनगरवाडी , ता . नगर ) याला विनयभंग , तसेच पोक्सो कायद्यान्वये दोषी धरून न्यायालयाने एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे . याच गुन्ह्यातील आरोपी विकास तुळशीराम शिकारे , सुभद्रा तुळशीराम शिकारे ( दोघे रा . धनगरवाडी , ता . नगर ) यांना मारहाण केल्याप्रकरणी दोषी धरून प्रत्येकी एक हजार रुपये दंड , सुभद्रा शिकारे हिला कलम 504  प्रमाणे दोषी धरून पाचशे रुपये दंड , अशी शिक्षाही ठोठावली आहे . जिल्हा .न्यायाधीश माधुरी एच . मोरे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे .
 अल्पवयीन मुलगी 29 ऑगस्ट 2018रोजी विद्यालय मध्ये जाण्यासाठी बसस्थानकावर उभी असताना सचिन शिकारे याने तिचा हात धरून छेड काढली होती . मुलीने घडलेला प्रकार आई – वडिलांना सांगितल्यानंतर सचिनच्या घरी गेले . तेथे विकास व सुभद्रा शिकारे यांनी मुलीसह तिच्या आई – वडिलांना मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती . याप्रकरणी पीडित मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . पोलिस उपनिरीक्षक एस . आर . गोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते . न्यायालयासमोर आलेले साक्षी – पुरावे , सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे