आगडगावमध्ये भैरवनाथ जयंती सोहळा उत्साहात संपन्न,

प्रत्येक गावातील धार्मिक स्थळामुळे गावाच्या विकासाला हातभार लागतो . धार्मिक स्थळे ग्रामीण संस्कृतीचा कणा असतात . आगडगावमध्ये भैरवनाथ देवस्थानामुळे चांगला विकास झाला . विश्वस्त मंडळानेही सचोटीने पारदर्शकपणे काम केले . वर्षभरात झालेल्या कामाचा हिशेब मांडणे अनुकरणीय आहे , असे मत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले . पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल भैरवनाथ देवस्थान , तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा काळभैरवनाथ जयंती सोहळ्यात नागरी सत्कार करण्यात आला . सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजी कर्डिले होते .  , उद्योजक नरेंद्र फिरोदिया , शिवसेनेचे नेते गोविंदराव मोकाटे , बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे , चैतन्य स्वामी , तसेच मान्यवर उपस्थित होते .
अन्नदाते अतुल पारख , गणेश आव्हाड , आशिष पोखर्णा , तसेच इतर अन्नदाते , तसेच देवस्थानाला मदत करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . शिवाजी कर्डिले म्हणाले , की ग्रामस्थांच्या एकीतून स्थापन झालेले हे देवस्थान एक आदर्श ठरले आहे . प्रत्येक पाच वर्षांनी ग्रामसभेतून विश्वस्तांची निवड होते . ही पद्धत एकमेव आहे . देवस्थानाच्या माध्यमातून गावाचा चांगला विकास होत आहे . देशातूनच नव्हे तर परदेशातूनही नागरिक येत आहेत , ही मोठी उपलब्धी आहे . देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी वर्षभरात झालेल्या कामांच्या अहवालाचे वाचन केले . पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे , देवस्थानचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी देवस्थानाची माहिती दिली . विश्वस्त दिलीप गायकवाड ,तुळशीदास बोरुडे , नितीन कराळे , गोरक्षनाथ जाधव , चंद्रकला खाडे , संभाजी कराळे, मुरलीधर कराळे आदीनी मान्यवरांचे सत्कार केले . सूत्रसंचालन दीपक गुगळे यांनी केले . सचिव त्रिंबक साळुंके यांनी आभार मानले . या वेळी पंचक्रोशीतील , तसेच नगर सह  महाराष्ट्रातून  , उत्तर प्रदेशातून आलेले भाविक उपस्थित होते .