आरपीआयच्या माध्यमातून भिंगारला असंघटित कामगारांची नोंदणी करुन ई श्रम कार्डचे वाटप

भिंगार परिसरातील हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी आरपीआयच्या (आठवले) माध्यमातून ई श्रम कार्डची दोन दिवस नोंदणी अभियान घेऊन नोंदणी झालेल्यांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी भिंगार छावणी परिषदेचे सदस्य तथा भाजपचे भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, नोंदणी अभियानाचे आयोजक आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनिल काळे, आरपीआय आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, तालुकाध्यक्ष तुषार धावडे, विक्रम चव्हाण, सचिन करोसिया, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, विशाल ठोंबे, बापू भोसले, सनी संगत, पापा छजलाने, योगेश भगवाने, सचिन छजलाने आदी उपस्थित होते.
वसंत राठोड म्हणाले की, शेवटच्या घटकापर्यंत सरकार पोहचविण्यासाठी केंद्राच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास या विचाराने सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य भाजप सरकार करीत आहे. ई श्रम कार्डधारकांच्या माध्यमातून शासनाला लाभार्थी असलेल्या असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्याचे लाभ थेट त्यांच्या पर्यंत घेऊन जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित काळे म्हणाले की, भिंगार भागात मोठ्या प्रमाणात हातावर पोट असलेले असंघटित कामगार वास्तव्यास आहे. या अशिक्षित श्रमिक कामगारांची ई श्रम कार्डची नोंदणी होण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला होता. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य सुरु आहे. श्रमिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ई श्रम कार्डच्या माध्यमातून त्यांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. श्रमिक कामगार अशिक्षित असल्याने त्यांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. या ई श्रम कार्डद्वारे केंद्र शासनाचे अनेक फायदे थेट लाभार्थींना मिळणार असल्याचे स्पष्ट केले. भिंगार येथील पंचशिलनगर मधील किसन सारडा समाज कल्याण केंद्रात ई श्रम कार्ड नोंदणी अभियान दोन दिवस घेण्यात आले. यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त लाभार्थींनी नोंदणी केली. या अभियानासाठी आरपीआयच्या युवकांनी परिश्रम घेतले.