आरपीआयच्या शहर उपाध्यक्षपदी हुसेन चौधरी यांची नियुक्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात युवा कार्यकर्ते हुसेन चौधरी यांनी प्रवेश केला. आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी चौधरी यांचे पक्षात स्वागत करुन त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. यावेळी  आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर कार्याध्यक्ष आजीम खान, प्रशांत म्हस्के, धीरज परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुशांत म्हस्के म्हणाले की, अन्यायाला वाचा फोडून दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआय कटिबध्द आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी आरपीआयचा संघर्ष सुरु असून, पक्षाचे कार्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने सुरु असल्याने युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना हुसेन चौधरी यांनी आरपीआयच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन सामाजिक प्रश्‍न सोडविण्यास पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.