एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनास आम आदमी पार्टीचा पाठिंबा

एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनास आम आदमी पार्टीचा पाठिंबा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांचे कुटुंबीयांसह सुरु असलेल्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. बुधवारी (दि.17 नोव्हेंबर) आम आदमीच्या पदाधिकार्‍यांनी तारकपूर बस स्थानक आगार येथे आंदोलनात सहभागी होऊन आंदोलकांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी आम आदमी पार्टीचे राजेंद्र कर्डिले, भरत खाकाळ, संपत मोरे, रवी सातपुते, दिलीप घुले, अशोक डोंगरे आदी उपस्थित होते.


राजेंद्र कर्डिले यांनी महागाईच्या काळात अत्यंत कमी वेतनात एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सेवा देत असून, त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. महामंडळाच्या 38 कर्मचार्‍यांनी निराशेपोटी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने त्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे सांगितले. राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळास राज्य शासनाचा दर्जा द्यावा, एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळावे, आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.