कोठडीतून पलायन केलेल्या आरोपींना मदत करणार्‍या दोघांना अटक

राहुरी येथील कारागृहातून शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान खिडकीचे गज कापून पळालेल्या मोक्कातील टोळी प्रमुख सागर भांड याच्यासह पाच आरोपी पसार झाले होते. त्यांना पळून जाण्यास मदत केलेल्या राहुरी व संगमनेर येथील दोन जणांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले.
करण जालिंदर मुसमाडे वय २३ वर्षे राहणार देसवंडी ता. राहुरी व मारुती ठका बिडगर वय २४ वर्षे राहणार डिग्रस- मालुंजे, ता. संगमनेर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले. दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजे दरम्यान कारागृहातून पसार झालेले सागर अण्णासाहेब भांड वय २५ वर्षे राहणार ढवण वस्ती, नगर, हल्ली राहणार संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे, किरण अर्जुन आजबे वय २६ वर्षे राहणार भिंगार. यांना राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर पाण्याची टाकी परिसरात पाठलाग करून पकडण्यात आले होते. तर जालिंदर मच्छिंद्र सगळगिळे वय २५ वर्षे राहणार टाकळीमिया, ता. राहुरी. याला मनमाड येथून पकडण्यात आले.
नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी वय २२ वर्षे राहणार मोरे चिंचोली, ता. नेवासा, रवी पोपट लोंढे वय २२ वर्षे राहणार घोडेगांव, ता. नेवासा हे दोन आरोपी अद्याप पसार आहेत. पोलीस पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. कोठडीतून पळालेल्या पाच आरोपीं विरोधात कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याचा व कट रचल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान आरोपींना पळून जाण्यास मदत करणारा करण मुसमाडे पोलीस ठाण्याच्या बाहेर चहाची टपरी चालवितो. टोळी प्रमुख सागर भांड याच्या पत्नीने करण मुसमाडे मार्फत कारागृहातील खिडकीचे गज कापण्यासाठी व्हॅक्स ब्लेड, बॅटरी व मोबाईल पुरविल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. मदत करणारा दुसरा आरोपी मारूती बिडगर हा घटनेच्या रात्री दुचाकीवर राहुरी बस स्थानकात आरोपी भांड याची वाट पहात होता. घटनेच्या रात्री पोलिसांच्या गस्ती पथकाने आरोपी मारूती बिडगर याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांना कबुली जबाब दिला.
टोळी प्रमुख भांड याच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गेले होते. परंतु आरोपी सागर भांड याची पत्नी फरार झाली आहे. पोलीस तिचाही शोध घेत आहेत.
राहुरी कारागृहातील चार नंबर कोठडी मधील खिडकीचे तीन गज कापण्यासाठी आरोपींनी व्हॅक्स ब्लेडचा वापर केल्याचे तपासात समोर आले. एका रात्रीत गज व लोखंडी जाळी कापणे कठीण आहे. त्यासाठी दोन तीन रात्री गेल्या असण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी साहित्य गोळा करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस आरोपींनी पळून जाण्याचे कारस्थान रचले असण्याची शक्यता आहे. चार नंबर कोठडीमध्ये एकूण सतरा आरोपी होते. पाच जणांचे कारस्थान इतर बारा आरोपींना समजले नव्हते काय? आरोपींनी गज कापतांना व पलायन करतांना कोठडीतील इतर आरोपींनी आरडा ओरडा केला नाही. ते भीतीपोटी बोलले नाहीत. आरोपींना पलायन करण्यासाठी त्यांनी मदत केली. याचीही चौकशी सुरू आहे.