खराब टायरमुळे समृद्धी महामार्गावर ७५० वाहनांना नाकारला प्रवेश

शिर्डी: परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेच्या राबवलेल्या विविध उपक्रमामुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या पाच महिन्यातच साडेसातशे ने कमी झाला आहे. समृद्धी महामार्गावर १० एप्रिल पासून आतापर्यंत १५००० वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात येऊन, साडेसातशे वाहनांना खराब टायर मुळे समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू केला आहे. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी इंटरचेंजवरील टोल नाक्यावर टायर तपासणी केंद्राचे श्री. भिमनवर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रस्ता सुरक्षा कक्षाचे उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, औरंगाबादचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटोळे, सहाय्यक परिवहन अधिकारी मनीष दौंड, सिएट लिमिटेडचे सुनील श्रीनिवास पत्की उपस्थित होते. यावेळी श्री. भिमनवर म्हणाले, वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांचे समुपदेशन करण्यासाठी परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन केली आहेत. आत्तापर्यंत ३००० हून अधिक वाहनधारकाचे समुपदेशन करण्यात आले आहे. या टायर तपासणी केंद्रावर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर, दुरुस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.