गाळ्याच्या वादात कर्मचार्‍याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार

मार्केटयार्ड येथील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील एका गाळ्यात मालकाच्या सांगण्यावरुन साफ-सफाई करण्यास गेलेल्या कर्मचार्‍याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी ऋषभ बोरा याच्यावर शनिवारी (दि.12 फेब्रुवारी) कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

शोएब फतरुद्दीन सय्यद (वय 25 वर्षे, रा. भोसले आखाडा) मार्केटयार्ड येथील ओम साई एजन्सी मध्ये मागील तीन वर्षापासून काम करत आहे. शुक्रवारी (दि.11 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 4 वाजता मालक औसरकर यांनी समोरील गाळ्याची  सफाई करण्यास पाठविले. त्या ठिकाणी इतर चार महिला सफाई काम करत होते. 5 वाजेच्या दरम्यान ऋषभ बोरा हा गाळ्यात आला व साफसफाई करणार्‍या महिलांना शिवीगाळ करु लागला. सय्यदने त्याला त्याला शिवीगाळ नको करण्याचे सांगताच बोरा याने लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्याला धरीत असताना बोरा याने डोळ्यात मिरचीची पूड टाकली. यावेळी उपस्थित महिला भांडण सोडविण्यासाठी आल्या, मात्र त्याने धारदार शस्त्राने डाव्या हताच्या दंडावर वार करुन गंभीर जखमी केले. जखमी सय्यद  यांना त्याचे मालक व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि. कलम 326, 323, 504, 506 प्रमाणे बोरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सहा. पो.नि. गजेंद्र इंगळे करत आहे.