गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार

अहमदनगर —– गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार झाला. प्रदीप एकनाथ पागिरे, (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

 
दरम्यान ही घटना आत्महत्या की खून ? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राहुरी तालुक्यातील टेलचे गाव म्हणून ओळख असलेल्या गुंजाळे येथे प्रदीप पागीरे याचा टेलरिंगचा व्यवसाय होता.गोळीबाराचा आवाज परिसरात झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. प्रदीपच्या छातीत गोळी घुसल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.गोळीबाराच्या घटनेपूर्वी प्रदीपचा मित्र बरोबर असल्याची चर्चा परिसरात होती.

घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, काॅन्सटेबल दिनकर चव्हाण, आदिनाथ पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर विभागाचे पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी गुंजाळे येथे जावून घटनेची माहिती घेतली.घटनेच्या तपासासाठी पोलिस श्वान, ठसे तज्ञाला घटनास्थळी पाचारण केले.मात्र, श्वान घटनास्थळी घुटमळल्याने माग निघू शकला नाही. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी प्रदीपचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.