गावाचे गावपण जपणार्‍या वेस उभारणीसाठी शहापूर केकती गावकरींचा पुढाकार

फ्लॅट आणि बंगलोच्या जमान्यात गावातील वाडे व वेस लोपपावत चालल्या असून, गावाचे गावपण जपणारी वेस उभारण्यासाठी शहापूर केकतीच्या (ता. नगर) गावकर्‍यांनी पुढाकार घेतला असून, या वेस उभारणीचे नुकतेच भूमीपूजन करण्यात आले.
पंधरा ते वीस वर्षापुर्वी शहापूर केकती गावाची भव्य वेस होती. ती ऊन, वारा, पाऊसाने जीर्ण होऊन पडली. ही वेस पुन्हा दिमाखात भव्य स्वरुपात उभारुन गावाचे वैभव जपण्यासाठी सर्व गावकरींनी लोकवर्गणीतून वेस उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. गावाच्या प्रवेशद्वार असलेल्या मारुती मंदिरासमोर ही भव्य वेस उभारण्यात येत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब बेरड यांच्या हस्ते नारळ वाढवून वेसच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले.


गावात वेस उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सरकारी निधी घेण्यात आला नसून, हे काम पुर्णत: लोकवर्गणीतून होत आहे. गावातील काही राजकीय पुढारी सोशल मिडीयावर स्वत: वेस बांधत असल्याचा खोटा प्रचार करीत असून, जनतेच्या पैश्यातून ही वेस उभी राहत असल्याची प्रतिक्रिया गावकर्‍यांनी यावेळी दिली.
पूर्वी गावांच्या वेशीला खूप महत्त्व होतं. गावची दिव्यता वेशीवरुन ठरली जायची. अनेक गावात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असायचा तो म्हणजे वेस. सण उत्सव काळातही वेशींना महत्त्व असून, गावातील गावपण या वेशींमुळे टिकून आहे. शहापूर केकती येथे तब्बल साडे चार ते पाच लाख रुपये खर्च करुन ही वेस उभी राहत असून, वेसची उंची 25 फुट तर रुंदी 30 फुट राहणार आहे. संपुर्ण काम आरसीसी राहणार असून, वेसच्या वर मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.