गावात सर्रासपणे फिरणार्‍या आरोपी मोकाटे याला अटक व्हावी

लैंगिक अत्याचार करुन सर्रासपणे गावात फिरणारा आरोपी गोविंद मोकाटे याच्याकडून जीवितास धोका असून, त्याला त्वरीत अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांना दिला. आरोपीला अटक न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा सदर महिलेने दिला आहे.  जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तर या प्रकरणात आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले. अनेक दिवस उलटूनही आरोपी मोकाटे अद्यापि फरार आहे. त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाटे इमामपुर (ता. नगर) गावामध्ये खुलेआम फिरत आहे. राजकीय पुढारी व मंत्रींची त्याच्या मागे ताकद असल्याने व पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याने त्याला अटक होत नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.
आरोपी मोकाटे राजकीय नेते मंडळींबरोबर गावात चर्चा करत असल्याचे फोटे देखील पिडीत महिलीने पोलिस अधीक्षक कार्यालयात पुरावा म्हणून दिला आहे. आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिस करत नसल्याने स्वत: व कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे पिडीत महिलेने निवेदनात म्हंटले आहे.