गोरे डेंटल क्लिनिक व संत सावता माळी युवक संघाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा उपक्रमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत -डॉ.सुदर्शन गोरे

गेल्य दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु होते, आता शाळा पूर्ववत सुरु होत आहेत. त्याचबरोबर मुलांमधील कला-गुणांना वाव देणारे उपक्रमही आता सुरु झाले आहेत. युवक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला-निबंध स्पर्धेचा उपक्रम राबवून त्यांच्यातील बर्‍याच दिवसांपासून सुप्त असलेल्या गुणांना वाव दिला आहे. अशा उपक्रमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊन त्यांचा अभ्यासावरही चांगला परिणाम होत असतो. युवक संघाचे कार्य समाज घटकांना प्रोत्साहन देण्याचेच राहिले आहे, त्यासाठी विविध उपक्रम राबवून समाज संघटनेचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत, असे प्रतिपादन डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले.

गोरे डेंटल क्लिनिक व संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी समता परिषदेचे अंबादास गारुडकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, युवक संघाचे संस्थापक सचिन गुलदगड, डॉ.सुदर्शन गोरे, जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, बाळासाहेब भुजबळ, दिपक खेडकर, विशाल पटवेकर, राजेंद्र पडोळे, हर्षदा घोडके, सुनिल सकट, अश्विनी कोल्हे, रोहिणी लोणकर, स्वाती सुडके आदि उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन गुलदगड म्हणाले, श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने राज्यभर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सुरु आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर महिला, विद्यार्थी यांच्यासाठी विविध उपक्रमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विविध वयोगटातील विद्यार्थी चित्रकला व निबंध स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते, बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, दत्ता जाधव आदिंनी मनोगत व्यक्त करुन संघाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

प्रास्तविक अशोक तुपे यांनी केले तर आभार दिपक खेडकर यांनी मानले.