‘नो मास्क नो एन्ट्री’ – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात ‘नो मास्क नो एन्ट्री’ चे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.सोबतच सर्व हॉटेल्स आणि आस्थापनासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या तालुक्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण कमी झाले आहे त्या तालुक्यातील संबंधित यंत्रणाना लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन शिर्डी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. तर काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेमुळे तेथील कोविड आयसीयू वॉर्ड जळून खाक झाला असल्याने कोरोना धोका लक्षात घेऊन तातडीने 12 बेडचा आयसीयू वॉर्ड उभारण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शिर्डी संस्थानकडे आवाहन करून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली .