घर घर लंगर सेवेने वंचित घटकांना वाटले तब्बल एकोणीस दिवस 5 हजार फराळचे पाकिटे

डोंबारी समाज, ऊसतोड कामगार यांच्या पालावर जाऊन तर घंटागाडी चालक, सफाई कामगार, बालनिरीक्षण गृहातील बालकांची केली दिवाळी गोड

कोरोनाच्या संकटकाळात गरजू गोर-गरीब घटकातील भुकेलेल्यांना जेवण व इतर गरजूंना मदत पोहचविणार्‍या घर घर लंगर सेवेने तब्बल एकोणीस दिवस जिल्ह्यातील वंचितांना फराळ वाटून त्यांची दिवाळी गोड केली. विविध ठिकाणी वास्तव्यास असेले डोंबारी समाज, ऊसतोड कामगार यांच्या पालावर जाऊन तर शहरातील कचरा उचलणारे घंटागाड्याचे चालक, रेल्वे स्थानक येथील वंचित घटक, सफाई कामगार, बाळ निरीक्षक गृहातील बालके यांना 5 हजार फराळाचे पाकिट वितरीत करण्यात आले. तर गरजेनूसार थंडीनिमित्त ऊबदार ब्लँकेट, कपड्यांचे वाटप देखील करण्यात आले.


फराळ वाटप अभियानाची सुरुवात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सौ. मीनल मनोज पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, जनक आहुजा, सुनिल छाजेड, कैलाश नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, राजेंद्र कंत्रोड, सुनील थोरात, सतीश गंभीर, प्रमोद पंतम, शरद बेरड, प्रशांत मुनोत, मन्नू कुकरेजा, राजू जग्गी, सिमर वधवा, आनंद बोरा, वांबोरीचे पोलीस मित्र आशितोष नवले आदी उपस्थित होते.


पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घर घर लंगर सेवा नेहमीच वंचितांच्या पाठिशी उभी राहिली आहे. कोरोनाकाळात माणुसकीच्या भावनेने त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण असून, वंचितांची दिवाळी गोड होण्यासाठी त्यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी सर्व कुटुंबीय आपल्या घरात दिवाळी साजरी करत असताना लगंर सेवेच्या सेवादारांनी वंचितांच्या झोपड्यात जाऊन आनंदाचा दिवा प्रज्वलीत केला असल्याचे सांगितले. 1 नोव्हेंबर पासून सुरु असलेले फराळ वाटपचे उपक्रम गुरु नानक देवजी यांच्या 19 नोव्हेंबर रोजीच्या जयंती पर्यंत अविरत सुरु होते. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली.