छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद

ज्येष्ठ नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभावाची शिकवण होती. तर दुर्बल व वंचित घटकांना त्यांनी न्याय व आधार देण्याचे कार्य केले. या महापुरुषांच्या विचाराने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा घडत असल्याची भावना स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी तापकिरे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वसंत कापरे, राजेंद्र बोरुडे, डॉ. विशाल घंगाळे आदी उपस्थित होते.
तापकिरे पुढे म्हणाले की, समाजासाठी आपण काही देणं लागतो या कर्तव्य भावनेतून गेल्या पंचवीस वर्षांपासून दीन दुबळे, वंचित, ज्येष्ठांसाठी निस्वार्थ भावनेतून मनापासुन सेवा करणारे जालिंदर बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो नेत्रदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, या शिबीराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरविण्यात येत आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 291 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी रक्तदान व मधुमेह तपासणी देखील करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 65 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांनी अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन दिले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केलेल्या रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. या शिबीरात डॉ. वसंत देशमुख, सचिन सोनवणे, माया आल्हाट, अमित पिल्ले यांनी तपासणी केली. तसेच गरजूंना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.