जवान मित्र मंडळाच्या वतीने ख्रिसमस निमित्त गरजूंना ब्लँकेटचे वाटप.

ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे हे 34 वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
ख्रिसमस निमित्त कोठी येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेटचे व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रुपसिंग कदम, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, सामाजिक कार्यकर्ते विनोद कदम, नगरसेविका रूपाली पारगे (कदम), जोसेफ पारगे, आरिफ शेख, बाळासाहेब भुजबळ, राहुल उमाप, विजय साठे, संजय लोखंडे सर, कादिर शेख, आसिफ शेख, नदीम शेख, फिरोज शेख, अतुल शिंदे, आकाश साळवे, राहुल भिंगारदिवे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुख, शांती व समृध्दीसाठी धर्मगुरुंनी प्रार्थना केली. प्रास्ताविकात विनोद कदम यांनी ख्रिसमस निमित्त कोठी येथे राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. आ.संग्राम जगताप म्हणाले की, वंचितांच्या सेवेतच प्रभुची सेवा आहे. प्रभु येशु ख्रिस्तांनी दीनदुबळ्यांवर प्रेम करण्याचा दिलेला संदेश या उपक्रमाने आचरणात आला आहे. सामाजिक उपक्रमात असलेले सातत्य व वाढत्या थंडीची तीव्रता लक्षात घेवून जवान मित्र मंडळाने गरजूंना केलेले ब्लँकेट वाटप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले व ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यांच्या सेवेने द्विगुणीत झाला असल्याचे यांनी सांगितले.