जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने लावणार्‍यांवर कारवाई करावी आरपीआयची मागणी

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रस्त्यावर अस्थाव्यस्थपणे नो पार्किंगमध्ये वाहने लावली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतुक शाखेने नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करुन नागरिकांना शिस्त लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, विजय शिरसाठ, संतोष पाडळे, अभिजीत पंडित, दिनेश पाडळे, अजीम खान यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्नधान्य पुरवठा विभाग, जागा खरेदी विक्री कार्यालय असे अनेक विभाग आहेत. दिवसभरामध्ये हजारो नागरिक त्या ठिकाणी कामानिमित्त येतात. जिल्हाधिकारी कार्यालय येथील पराग बिल्डिंगच्या मैदानात पार्किंग सुविधा असून, देखील नागरिक बेशिस्तपणे परिसरात नो पार्किंगमध्ये आपले दुचाकी व चारचाकी वाहने लावत आहे. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून, या परिसरात सतत वाहतुक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरुन अहमदनगर महाविद्यालय, विद्युत महावितरण व मुस्लिम कब्रस्तानला जाण्यासाठी एकमेव रस्ता असून, या रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे. पुर्वी शहर वाहतुक शाखेकडून वाहनांवर कारवाई केली जायची. मात्र सध्या ही कारवाई ठप्प असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावली जात असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. तर जिल्हाधिकारी परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने लावणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.