टिपू सुलतान वक्तव्यप्रकरणी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ब्रिटीशांविरोधात लढणारे म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्याबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले. रिपाईच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री वळसे पाटील यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी रिपाईचे अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अजीम खान, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, संदीप वाघचौरे, नईम शेख, जावेद सय्यद, राहुल सोळंकी, विशाल भिंगारदिवे, अरबाज शेख, संतोष पाडळे, सज्जाद शेख, मतीन सय्यद, सोनू शेख, सज्जाद सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईच्या मालाड भागात एका क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करुन त्याला म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरुन वाद चिघळला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या नावाला विरोध केल्याने यामध्ये आनखी भर पडली आहे. शहरात रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध व्यक्त करुन गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने वक्तव्य केले आहे. टिपू सुलतान यांनी कोणत्या हिंदूंवर अत्याचार केले? त्याचे पुरावे सादर करावे. टिपू सुलतान हे धर्मनिरपेक्ष राजे होते. त्यांनी आपल्या काळात अनेक मंदिरांना जागा उपलब्ध करून दिल्या व दहा हजार सोन्याचे नाणे कांची मंदिराला दान दिल्याचे इतिहासात उल्लेख आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी चालणारा आहे. मात्र फडणवीस हे जातीवादी पक्षाचे असल्याने त्यांच्याकडून असे कृत्य होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर युवकांचे माथी भडकविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे. फडणवीस यांनी ब्रिटिशांविरोधात लढणार्‍या टिपू सुलतानबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य केले असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.