तहसील कार्यालयाच्या समोर तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

शेवगाव तहसील कार्यालयाच्या लोखंडी गेटसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने  शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब सर्जेराव घनवट (वय २९) रा. नजीक बाभूळगाव ता.शेवगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली याचे कारण अस्पष्ट असल्याने याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी ३० नोव्हेबर रोजी तहसील कार्यालयाच्या मुख्य लोखंडी गेट लगत असलेल्या लिंबाच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकत असल्याचे या रस्त्याने जाणा-या काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्यातील अण्णा पवार व त्यांच्या पोलीस सहकार्याने घटनास्थळी धाव घेवून लिंबाच्या झाडावरून तरुणाचा मृतदेह खाली उतरविला.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भाऊसाहेब घनवट असल्याची व तो तालुक्यातील नजीक बाभूळगावचा रहिवाशी असून तो कापसाचा व्यापार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप समजू शकले नाही.